शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

Wednesday, August 3, 2011

सावळ्याचे मूळ आणि अभंगांचे रिमिक्स



विठू माउली हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. आषाढी एकादशी ही वारकर्‍यांची दिवाळी. वर्षभर प्रपंचाचा सासुरवास सोसणार्‍या सुनवायरीने ज्या आतुरतेने दिवाळीच्या सणाची वाट पहावी तसं वारकर्‍यांचं मन आषाढी एकादशीची वाट पाहातं. त्या मनाला माहेपणाची आस लागते.
‘दिवाळीच्या मुळा
लेकी आसावली
पाहतसे वाटुली
पंढरीची.’

सबंध महाराष्ट्रातून अशा लाखो लेकी माउलीच्या भेटीसाठी पायी निघतात. मुखाने हरिनामाचा गजर चालेला असतो. कधी पाउली...कधी रिंगण...कधी फुगडी...कधी कीर्तन...कधी गोंधळ... पांडुरंगाच्या नाम स्मरणात वारकर्‍यांचा थकला भागला जीव रंगून जातो... दंगून जातो. देहभान विसरतो... संसाराच्या सुख-दु:खांचं काही देणं-घेणं या जीवाला नसतं.
वार्‍याच्या हाती बोलावणं येते आणि वारकर्‍यांचे पाय पंढरीच्या ओढीने चालू लागतात. ‘मूळ’ या मराठमोळ्या शब्दाचा अर्थच ‘न्यावयाला येणं’ असा आहे. संतांच्या अभंगांची भाषा ही अस्सल देशीवाणाची आहे. म्हणूनच तर ती अमृताशी पैजा जिंकते.

‘अरडी एवढी परडी गं
परडी एवढं फूल गं
दारी मूल कोण गं
दारी मूल सासरा गं”

भोंडल्याच्या ह्या गाण्यातलं ‘मूल’ म्हणजे ही ‘मूळ’. लोकभाषेत बोलणार्‍या दुसर्‍या एका अभंगात ‘मूळ’ हा शब्द पुन्हा एकदा आपल्याला भेटतो-
‘मुंगीचिया घरा
कोण जाय मूळ
देखोनिया गूळ
धाव घाली.’

मुंग्यांच्या घरी कोणी बोलावणं धाडत नाही की चला चला त्या तिकडे गूळ आहे. गुळाच्या गोडीनं त्या आकर्षित होतात. धावत सुटतात. पण त्या कधीही रांग मोडत नाहीत. धक्के देऊन एकमेकींना रांगेबाहेर काढत नाहीत. पायात पाय घालून सोबतिणींना पाडत नाहीत. अमकीच्या आधी मला गूळ मिळाला पाहिजे. तमकीपेक्षा थोडा जास्त मिळाला पाहिजे. म्हणून हेवादावा करीत नाहीत. रांग न मोडता निमूटपणे चालत राहतात... आपला नंबर येण्याची वाट पाहतात... आणि सगळ्या सुखी होतात...
मुंग्यांना जे साधलं ते लेकाचं माणसांना का जमत नाही. संपूर्ण निसर्गात माणूसच असा एकमेव प्राणी आहे. ज्याला जगण्याची फार घाई आहे. जगण्याच्या ह्या घाईला विज्ञानानं जी गती दिली ती जीवघेणी आहे. त्या गतीनं प्रगती व्हायला पाहिजे होतं पण ती अधोगती होताना दिसते आहे. माणसाचं मन आज कमालीचं अशांत आहे. जेवणासाठी पंचपक्वानांचं भोजन तयार आहे. पण अन्नावरची वासना उडाली आहे. पहुडण्यासाठी मऊ बिछाना तयार आहे पण झोप कुठच्या कुठं पळाली आहे.
‘कोठुनी येते मला कळेना
उदासीनता ही हृदयाला
येथे नाही, तेथे नाही
काय पाहिजे मिळवायाला. ’
अशी काहीशी आपली अवस्था झाली आहे. अशा अवस्थेतच ‘भवताप’ या शब्दाचा अर्थ आपल्या जाणीवेच्या कक्षेत प्रवेश करु लागतो. त्याच्या आशयाची प्रचिती आपल्याला येऊ लागते. मनाची लेक सासुरवास भोगू लागते... दमते... थकते... माहेरपणासाठी आसावते. आषाढीच्या निमित्तानं दिवाळीचं मूळ येतं. मग ती हरिखते. उल्हासित होते. आणि मग...पाउले चालती पंढरीची वाट...
अठ्ठावीस युगापासून कटेवर कर ठेऊन विटेवर उभे असलेले हे सुंदर ध्यान पाहून संतांना वेड लागले. ह्या ध्यानानं उभा-आडवा महाराष्ट्र झपाटला आहे. शब्दांचे जोडकाम करणारे बिचारे कवी-लेखकही त्यातून सुटले नाहीत. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ च्या चालीवर ‘एक तरी वारी पैदल चालावी’ असा संकल्प त्यांच्याकडून सोडला जातो. कधी तो सिद्घीस जातो. कधी तो प्रसिद्घीस जातो.
कोणे एके काळी एका नामवंत लेखिकेने अशीच वारी केली म्हणतात. तिनं तिच्या पद्घतीनं तिच्या भाषेत, तिच्या शैलीत म्हटलं म्हणतात, ‘विठ्ठल हा माझा बॉय फ्रेंड आहे.’ त्या काळात तिचं हे विधान खूप गाजलंही होत म्हणतात. खरंतर तिला म्हणायचं असेल, विठ्ठल हा माझा मित्र आहे. सखा आहे. अगदी संत जनाबाईला वाटतो तसा जीवलग आहे. तुकोबारायांनी नाही का मधुराभक्तीच्या अंगानं म्हटलं-
‘घररिघी झाली
पट्टराणी बळे
वरिले सावळे
परब्रह्म.’

सावळ्या परब्रह्माला वरण्यासाठी मी त्याचं घर निघाले. आणि माझ्या भावभक्तिच्या बलाने मी त्याची पट्टराणी झाले. ‘घरनिघी’पासून ‘पट्टराणी’ झालेली तुकोबाची भावावस्था आपण सहजपणे स्वीकारली. पण ‘बॉयफ्रेंड’ स्वीकारणं आपल्याला जड गेलं. अभिव्यक्तीचं माध्यम बदललं की काय गहजब होऊ शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण आहे.
आज हे सगळं पुन्हा एकदा आठवण्याचं कारण असं की काही कॅसेट कंपन्यांनी संतांच्या अभंगांचं रिमिक्स करून वारीच्या निमित्तानं त्याचा अक्षरश: ‘धंदा’ करण्याचं ठरवलं. त्याला वारकर्‍यांनी विरोध केला. आपण नुसती कल्पना केली की ‘मुन्नी बदनाम हुई’ किंवा ‘शीला की जवानी’ या सुपरडुपर ‘हिट’ सिनेगीतांच्या चालीवर आपण संतांचे अभंग ऐकतो आहोत तर आपल्या भाविक मनाची काय अवस्था होईल? वारक‍र्‍यांचा हा विरोध केवळ सात्विकच नाही तर ती त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. मंगलाष्टकं जशी परंपरागत चालीत प्रभावी वाटतात. तसेच अभंग ही पारंपारिक सुरावटीतच आपल्या मनाला भावतात. ‘मेणाहून मऊ असलेल्या विष्णूदासांना वज्रास भेदण्याएवढे कठीण’होण्याचा हा प्रसंग आहे. आठशे वर्षाहून जुना आपला अस्सल देशीवाणाचा ठेवा जतन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने वारकर्‍यांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. प्रखर आणि तीव्र विरोध केला पाहिजे.आणि विठ्ठल भक्तीचा ‘धंदा’ करणार्‍यांचा डाव हाणून पाडला पाहिजे.

‘दया तिचे नाव
भुतांचे पालन’

अशी ‘दया’ ह्या शब्दाची व्याख्या करताना तुकोबारायाच्या अभंगातील अर्धाच भाग नेहमी सांगितल्या जातो. त्याच अभंगाचा उरलेला अर्धा भाग ह्या व्याख्येत जोडल्या शिवाय ती व्याख्या संपूर्ण होत नाही-
‘दया तिचे नाव
भुतांचे पालन
आणि निर्दालन
कंटकांचे.’




- श्रीकृष्ण राऊत

No comments:

Post a Comment